भारतातून 55 हजार टन कांदा परदेशात जाणार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशातील कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी केली होती. आता मात्र सरकारने यावरील बंदी उठवली आहे. भारतातील जवळपास 55 हजार टन कांदा परदेशात निर्यातीला परवानगी दिली आहे. बांगलादेश, मॉरिशस, बहारिन आणि भुटान या देशांमध्ये कांद्याची निर्यात करण्यात येणार आहे.

सरकारने कांदा निर्यातीला बंदी घातली होती. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. याविरोधात शेतकरी, संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करीत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ही निर्यात बंदी उठवली. त्यानंतर एक महत्वाचा निर्णय जाहीर करत केंद्राने कांदा निर्यातदारांना 54,760 टन कांदा बांगलादेश, मॉरिशस, बहारिन आणि भुटान या देशांमध्ये निर्यातीला परवानगी दिली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी ही माहिती दिली.

कांदा निर्यातबंदी केल्याने विविध बाजार समितीत कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे आपले मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे हेोते. यामुळे अखेर केंद्र सरकारला निर्यात बंदी उठवावी लागली. या निर्णयामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version