कोव्हिड साथ असतानाही राज्यातील 597 आरोग्य सेविका कार्यमुक्त

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचार्‍यांमध्ये असंतोष
बेमुदत उपोषणाचा इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत ग्रामीण भागात रुग्णसेवा देणार्‍या राज्यातील 597 आरोग्य सेविकाना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे या मिशन अंतर्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यामध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. हे अभियान सुरू झाल्यापासून सेवारत असणार्‍या कर्मचार्‍याना अचानक कार्यमुक्त करण्यात आले आहे त्यात रायगडमधील 13 आरोग्य सेविकांचा समावेश आहे. त्यासाठी बाळंतपणाच्या केसेस कमी झाल्याचे कारण दाखवण्यात आले आहे. मात्र आम्ही कोविड काळात जीव धोक्यात घालून केलेल्या कामाची कुणी दखलच घेत नाही अशी खंत या आरोग्य सेविकांनी व्यक्त केली आहे. एकीकडे कार्यरत कर्मचार्‍याना कमी करत असताना दुसरीकडे आरोग्य विभागात नव्याने भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात या अभियानातील सर्व कर्मचारी एकवटले असून येत्या 14 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन करणार असून मुंबईतील आरोग्य भवनासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
कार्यमुक्त करण्यात आलेल्या आरोग्य सेविकांमध्ये रायगडमधील113पैकी 13 आरोग्य सेविकांचा समावेश आहे. त्यासाठी कोविड काळात बाहयरूग्ण संख्या तसेच बाळंतपणाच्या केसेस कमी झाल्याचे कारण दाखवण्यात आले आहे. मात्र आम्ही कोविड काळात जीव धोक्यात घालून केलेल्या कामाची कुणी दखलच घेत नाही अशी खंत या आरोग्य सेविकांनी व्यक्त केली आहे.
सरकारच्या या धोरणाविरोधात या अभियानातील सर्व कर्मचारी एकवटले असून येत्या14सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन करणार असून मुंबईतील आरोग्य भवनासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

आम्ही 15 वर्षे आरोग्य सेवा देत आहोत. कोविडसारख्या साथीमध्ये काम करताना आमच्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली. कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले. तरीदेखील आम्ही मागे हटलो नाही. आता सरकारने आम्हाला सेवेतून कमी करायला सुरूवात केली आहे. ही बाब अन्यायकारक आहे. गरज सरो आणि वैद्य मरो अशी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत आमच्याकडून चुकीचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल.
प्रतिभा भोईर, आरोग्य सेविका

Exit mobile version