6 ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर

सात ग्रामपंचायतीमध्ये राजकीय अस्तित्वासाठी निवडणूक
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळयातील 13 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी सरपंच व सदस्यपदासाठी अर्ज करण्यात आले असून, सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत. तर, सात ग्रामपंचायतीमध्ये राजकीय अस्तित्वासाठी निवडणूक होणार असल्याचे निदर्शनास येत आहे.

प्रथमच म्हसळा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुका आघाडीचे माध्यमातून लढविण्यात येत असल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती असे असले तरी तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीच्या खरसई,काळसुरी,कणघर,कांदलवाडा,निगडी आणि फळसप या सहा ग्राम पंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका बिनविरोध होणार आहेत. रेवळी ग्राम पंचायतीमध्ये सरपंच पद अनुसूचित जमातीकरीता राखीव असल्याने तेथे एकही अर्ज दाखल झालेला नाही. 7 सदस्य पदासाठी 9 अर्ज दाखल करण्यात आले असल्याने एक वॉर्डात सदस्य पदासाठी निवडणूक होणार असल्याचे समजते.

13 सरपंच आणि 94 सदस्य संख्यासाठी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी वरील सहा ग्राम पंचायतीचे सरपंच व सदस्य बिनविरोध तर निवडणुक होणार्‍या 7 ग्रामपंचायती पैकी तोंडसुरे सरपंच पदासाठी 4, सदस्य पदासाठी 8 अर्ज, तोराडी सरपंच पदासाठी 2 अर्ज, सदस्य पदासाठी 15 अर्ज, देवघर सरपंच पदासाठी 6 आणि सदस्य पदासाठी 30 अर्ज, घोणसे सरपंच पदासाठी 6 आणि सदस्य पदासाठी 10 अर्ज, लेप सरपंच पदासाठी 3 सदस्य पदासाठी 11 अर्ज,संदेरी सरपंच पदासाठी 4 आणि सदस्य पदासाठी फक्त 18 अर्ज दाखल झाले असल्याचे संबंधीत ग्राम पंचायतीचे निवडणूक पिठासीन अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले. म्हसळा तालुक्यात बिनविरोध सहा ग्राम पंचायती वगळता तोराडी, तोंडसुरे, घोणसे, देवघर, संदेरी, लेप या 6 ग्राम पंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी आघाडीविरोधात शिवसेना शिंदे गट, भाजप, शेकाप अशी लढत होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version