। दिल्ली । वृत्तसंस्था ।
युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढत आहे. युद्धाच्या चौथ्या दिवशीही सतत हल्ले होत आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. तर, पहिले विमान AI 1944 बुखारेस्टहून काल संध्याकाळी २१९ लोकांना घेऊन मुंबईला आले आणि दुसरी विमान आज पहाटे दिल्लीला पोहोचले होते. रोमानियाच्या राजधानीतून युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले होते. त्यानंतर आता तिसरे विमान देखील दिल्लीला पोहचले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या २४० भारतीय नागरिकांना घेऊन बुडापेस्टहून आलेले तिसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मृत्यूच्या विळख्यातून सुखरूपणे मायदेशी परतल्याचा आनंद युक्रेनमधून आलेल्या भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.