| अलिबाग | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील 25 वर्षीय तरुणीच्या मृत्यूला पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. मात्र अजूनही त्याची पोलीसांकडून साधी चौकशीदेखील करण्यात आली नाही. मृत्यू होऊन तीन दिवस उलटून गेले. तरीदेखील गुन्हा दाखल केला नसल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे, की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करीत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आश्वासनानंतर बुधवारी सायंकाळी सहानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना घडून तीन दिवस झाले आहेत. मात्र नागोठणे पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलीस चौकशीच्या नावाखाली कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
पोलीस अधीक्षकांनी एफआयआर दाखल करण्याची सूचना देऊनही स्थानिक पोलीस त्यापध्दतीने अंमलबजावणी करीत नाही, असे नातेवाईकांकडून सांगितले जात आहे. पोलीस कर्मचारीच तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे गेल्या चार दिवसांपासून नातेवाईक सांगत आहेत. पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी विनवणी पोलिसांकडे करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला नसल्याने नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हा दाखल न केल्यास पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन केले जाणार असा इशारा देण्यात आला आहे.
पंचनाम्यावर खोटी सही
माणगावमधील तरुणीच्या मृत्यूनंतर पोलीसांनी अकस्मात मृत्यूबाबत पंचनामा तयार केला. परंतु पंचमान्यावर तरुणीच्या वडीलांनी सही केली नसल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. ही सही खोटी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण येऊ लागले आहे.
अंत्यसंस्कार अलिबागमध्ये केले
पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी 24 तासानंतर तरुणीचा मृतदेह सायंकाळी ताब्यात घेतला. त्यांच्या नातेवाईकांनी अलिबाग येथील स्मशानभूमीत सायंकाळी सातनंतर अंत्यसंस्कार केले.