झोडपधारांमुळे 80 नागरिकांचे स्थलांतर

गेल्या 24 तासांत 326 मिमी पाऊस; 76 घरे, गोठे कोसळले; 12 ते 15 जुलै जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

| खास प्रतिनिधी | रायगड |

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने आपले रौद्ररुप दाखवले आहे. मागील 24 तासांमध्ये तब्बल 326.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत 18 कुटुंबांतील 80 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. आतापर्यंत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, 76 घरे, गोठे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. पाच म्हशी, दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच महाड तालुक्यात एनडीआरएफची एक तुकडी तैनात केली आहे. दरम्यान, 12 ते 15 जुलैपर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून, जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

28 पैकी 13 धरणे ओव्हर फ्लो
जिल्ह्यात मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी, जून महिन्यात पाऊस विशेष बरसला नाही. मात्र, जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून तो दमदार बरसत आहे. लघुपाटबंधारे प्रकल्पातील 28 पैकी 13 धरणे दुथडी भरुन वाहत आहेत. त्याचप्रमाणे कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या प्रमुख नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत.
80 नागरिकांचे केले स्थलांतर
पावसाच्या कालावधीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पेण तालुक्यात झाड पडून, तर महाड तालुक्यातील एक जण पाण्यात पडून मृत पावला आहे. गेली चार दिवस सातत्याने बरसत असलेल्या पावसाने 18 कुटुंबांतील 80 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
76 घरे, गोठे आणि दुकानांचे नुकसान
जोरदार बरसलेल्या पावसाने 33 अंशतः घरांचे नुकसान झाले असून, 24 अशंतः कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या पाण्यात 18 गोठे आणि एका दुकानाचेही नुकसान झाले आहे. तसेच एका सर्वाजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पाच म्हशी मृत पावल्या असून, दोन गायी जखमी झाल्या आहेत. दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून, दोन वासरे जखमी झाली आहेत.
जून महिन्यात पावसाने विशेष काही कामगिरी केली नाही. यादरम्यान तो बरसला नाही. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. मात्र, अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकर्‍यांसाठी तारक ठरले. आता भारतीय हवामान विभागाने 12, 13, 14 आणि 15 जुलैपर्यंत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनदेखील सर्तक झाले आहे. दरडग्रस्त गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून, स्थानिक प्रशासनाने सज्ज राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
Exit mobile version