| माथेरान | वार्ताहर |
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. आता वर्षापर्यटन सुरू असून, पावसाचा आणि धुक्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक माथेरान पर्यटनस्थळाला पहिली पसंती देताना दिसत आहेत. दरम्यान, याच माथेरानमधील रस्त्यांवर अंधार दाटलेला दिसून येत असून, अनेक विभागातील रस्ते अंधारात असल्याचे दिसत आहेत.
पावसाळ्यात येथील ढगाळ वातावरण व गर्द वनराई यामुळे दिवसाही येथे थोडासा अंधार जाणवतो. यामुळे सायंकाळानंतर येथील रस्त्यावरील पथदिवे महत्त्वाची भूमिका बजावतात; परंतु याच माथेरानमधील रस्त्यावरील काही ठिकाणचे पथदिवे सध्या बंद अवस्थेत असल्याने माथेरान शहर अंधारात हरवल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी हॉटेलबाहेर पडणारे पर्यटक आणि माथेरान टॅक्सी स्टँड येथून येणार्या पर्यटकांना शहरात दाखल होताना मुख्य महात्मा गांधी रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने अंधारातून रस्ता शोधत यावे लागत आहे. अशा प्रकारे माथेरान शहरातील अनेक विभागातील पथदिवे बंद असून, माथेरान गिरीस्थान नगरपालिकेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याकडे पालिकेने त्वरित लक्ष देऊन माथेरान शहरतील सर्वच विभागातील पथदिवे सुस्थितीत करून प्रकाशमान करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.