शेतीकामात महिलांचा ८० टक्के वाटा

भारतीय कृषी संशोधन परिषदेचा अहवाल
| पेण | प्रतिनिधी |
कमावत्या महिलांमधील 80 टक्के महिला या कृषीक्षेत्रात आहे, असे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे म्हणणे आहे. मुख्य कृषी उत्पादनात महिलांचा वाटा 75 टक्के आहे, फलोत्पादनामध्ये तो 79 टक्के आहे, तर मासेमारी आणि पशुधन यामध्ये तो 95 टक्के आहे. या सर्व कारणांमुळे महिला किसान दिन साजरा करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. आदिवासी जंगल जमीन कसणार्‍या महिलांसाठी पेण येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. दि. 12 व 13 ऑक्टोबरला पुणे येथे ‘मकाम’ची राज्यव्यापी परिषदेत महिला किसान दिन साजरा करण्यात आला. त्या धर्तीवर 15 ऑक्टोबर रोजी पेण येथे महिला किसान दिन साजरा केला. त्यावेळी त्या मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

गेल्या आठ वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेल्या महिला किसान मंच या नेटवर्कमार्फत ठिकठिकाणी राज्यामध्ये महिला किसान दिन मोठ्या प्रमाणात साजरा झाला. याचा एक भाग म्हणून अंकुर ट्रस्ट या संस्थेनेही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण, कष्टकरी, शेतमजूर महिलांचा किसान दिन साजरा केला. यामध्ये आदिवासी महिलांचे जमीन हक्क, कुळकायदा व कुळाचे हक्क, भूसंपादन कायदा व त्यामधील महिलांचे अधिकार या विषयी डॉ. वैशाली पाटील यांनी मांडणी केली. त्याचबरोबर महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळविण्यासाठी काय काय करणे गरजेचे आहे, यावर गट चर्चा करण्यात आली. पेण येथील काही महिला शेतकरी प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या राज्यव्यापी महिला शेतकरी परिषदेमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या महिलांनी आपले अनुभव कथन केले.

पुणे येथे मकाम या संघटनेद्वारे नुकतीच 12 व 13 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांची राज्यस्तरीय परिषद घेण्यात आली. यामध्ये लेखिका संध्या नरे- पवार , कॉ. किरण मोघे, सीमा कुलकर्णी, डॉ.वैशाली पाटील,मंगलखिंवसरा आदींनी आपले विचार मांडले. महिलांनी या परिषदेमध्ये सगळ्यात शेवटी आपल्या जाहीर मागण्यांचा ठराव एकमताने मंजूर करून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये पाठविण्याचे ठरविण्यात आले.

या परिषदेमध्ये उसतोड कामगार महिला संघटना, वन अधिकार मान्यता कायदा व त्याबाबतच्या समस्या, मिडिया आणि शेतकरी महिलेची प्रतिमा अशा प्रकारच्या सत्रांमध्ये विविध पत्रकार, लेखिका, शेतकरी आंदोलनातील नेत्या व विचारवंतांनी आपले मत मांडले. मराठवाडा, विदर्भ,रायगड,पुणेया विभागातून आलेल्या महिला शेतकर्‍यांनी आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव कथन केले. अशा पद्धतीने राज्य स्तरावर जशी महिला परिषद झाली, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील पेण येथेही या परिषदेचा पाठपुरावा म्हणून या दिवसाचे महत्त्व सांगण्याचे म्हणून आदिवासी महिलांची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

Exit mobile version