संकेत कांबळे पोलिसांच्या जाळ्यात
| नेरळ | प्रतिनिधी |
2019 पासून फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल असलेला तोतया सरकारी अधिकारी संकेत कांबळे यास नेरळ पोलिसांच्या पथकाने नवी मुंबई येथून ताब्यात घेतले. ओळख लपवून राहात असलेल्या संकेत कांबळे यास नेरळ पोलिसांच्या पथकाने पकडून आणले असून, या तोतया अधिकार्यावर नेरळ पोलीस ठाणे तसेच कराड, सातारा, खैरवाडी, चेंबूर, अंधेरी, पनवेल ग्रामीण, खडक पुणे आदी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
नेरळ पूर्व भागात राहणारा संकेत कांबळे हा तरुण मंत्रालयात गृह विभागात वरिष्ठ पदावर नोकरीत आहे असे भासवून खुद्द पोलिसांना विविध पदांची आमिषे दाखवून त्यांची फसवणूक करीत असल्याचे संशय येत होते. तो आणि त्याची पत्नी तोतया सरकारी अधिकारी असल्याचे बोलले जात असतानादेखील नेरळ पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकारी संकेत कांबळे यास मंत्रालयातील अधिकारी म्हणून मोठा मान सन्मान देत होते. त्यात त्याची पत्नी आणि संकेत यांच्यातील वयाचे अंतर बघता त्या दोघांचे नाते काही तरी गौडबंगाल असल्याचे सातत्याने बोलले जात होते. एक्झिक्युटिव्ह दर्जाचे कपडे आणि हातात आय फोन घेऊन अधिकारी वर्गासाठी भाषा वापरणार्या या संकेत कांबळे हा मुंबईऐवजी नेरळ पूर्व भागात भाड्याच्या घरात राहात होता. नेरळ पोलीस ठाण्यात दर आठवड्याला वावरणार्या संकेत कांबळे याने नाव बदलून वावरणार्या त्याच्या पत्नीने नोकर्यांची आमिषे दाखवून अनेकांकडून मोठ्या आर्थिक रकमा जमा केल्या होत्या. आणि नोकर्या लावण्यात अडचणी येत असल्याची करणे सांगून हे दाम्पत्य 2019 मध्ये नेरळ येथून अचानक गायब झाले आणि त्यानंतर त्या दोघांचे महाप्रताप समोर आले.
2019 पासून अनेकांना गंडा घालणारा संकेत विकास कांबळे यांच्यावर नेरळ पोलीस ठाणे येथे 2019 मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये नेरळ पोलिसांच्या हिट लिस्टवर असलेला संकेत कांबळे हा नवी मुंबई येथे नाव बदलून वावरत असल्याचे माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नेरळ पोलिसांनी सापळा रचून 18 सप्टेंबर रोजी नवी मुंबईत सापळा रचला. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या पथकाने तोतया सरकारी अधिकारी असलेल्या संकेत विकास कांबळे यास पकडून नेरळ येथे आणले. या कांबळेवर नेरळ पोलीस ठाण्यासह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.