डोक्यात टोकदार पेनाचे घातले घाव; तीन दिवसांनंतरही शिक्षिका मोकाट
| उरण | वार्ताहर |
उरण तालुका पुन्हा एका जबरदस्त हादरला आहे. उरण-जासईमधील घरगुती शिकवणी घेणार्या एका विकृत शिक्षिकेचा संतापजनक प्रताप समोर आला आहे.
नीता प्रकाश म्हात्रे असे या निर्दयी शिक्षिकेचे नाव असून, तिने एका पाच वर्षीय निरागस चिमुकलीचा अनन्वित छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पालकांनी मोठ्या विश्वासाने या शिक्षिकेकडे पाठवलेल्या चिमुरडीच्या डोक्यात नीता म्हात्रे हिने डोकदार पेन अनेकदा टोचून तिला रक्तबंबाळ केले. तसेच तिचे गाल आवळले आणि मारहाणदेखील केल्याचे चिमुकलीने सांगितले. तर, शिकवणीला येणार्या इतर मुलांनीदेखील ही बाब मुलीच्या पालकांना सांगितली.
मुलीच्या डोक्यात पेन टोचल्याने तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. ते मुलीच्या पालकांना दिसू नये म्हणून नीता म्हात्रे या चलाख शिक्षिकेने मुलीचे केसदेखील धुतले आणि हा प्रकार आई-बाबांना सांगायचा नाही, अशी जबर धमकी दिली. मुलीचे केस ओले असल्याचे आढळल्याने आईने मुलीकडे चौकशी केली असता नीता म्हात्रे या क्रूर शिक्षिकेचा प्रताप समोर आला.
त्यानंतर मुलीच्या पालकांनी लागलीच उरण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. मात्र, उरण पोलिसांनी आपल्या परंपरेनुसार या प्रकारणांकडेही हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्याचे पालकांनी सांगितले. अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई या निर्दयी शिक्षिकेकेवर झाली नसून, ती मोकाट फिरत असल्याचे समजते. महिला आणि मुलींच्या बाबतीत उरण पोलीस कधी गंभीर होतील? हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आज आपल्या पाल्यासोबत झालेली संतापजनक घटना उद्या इतरांच्याही निरागस मुलांसोबत घडू शकते म्हणून नीता म्हात्रे या शिक्षिकेवर कठोरात कठोर कारवाई करावी, तिचे क्लासेस बंद करून टाकावेत, अशी मागणी मुलीच्या पालकांसह परिसरातील संतप्त नागरिकांनी केली आहे.