| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने पैसे मागितल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीचे व्हिडीओ गायब झाले असून, एका क्रिप्टोकरन्सीची जाहिरात दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल असून, त्यावर सुनावणीचे व्हिडीओही अपलोड केले जातात. मात्र, अज्ञाताकडून हे चॅनल हॅक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे तंत्रज्ञान विभागाच्या रजिस्टारकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा एकही व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर दिसत नाही. एक व्हिडीओ प्ले होत असून, तो क्रिप्टोकरन्सी एक्सआरपीच्या जाहिरातीचा आहे. रिप्पल असे असे नाव दिसत असून, ‘ब्रॅड गार्लिंगहाऊस : रिप्पल रिस्पॉन्ड्स टू द एसईसी 2 बिलियन डॉलर फाईन. एक्सआरपी प्राइस प्रेडिक्शन’सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंठपीठासमोर खटल्यांची सुनावण्यांचे या यूट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाते. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.