धरणांच्या पातळीत कमालीची वाढ; 24 धरणे शंभर टक्के फुल्ल
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या अडीच महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे नदी, नाले, धरणे, विहीरी पाण्याने तुंडूंब भरून गेल्या आहेत. मे महिन्याअखेर पाण्याविना कोरडी पडलेली धरणेदेखील पाण्याने भरली आहेत. जिल्ह्यातील मुरूड, तळा, रोहा, पेण, अलिबाग, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, कर्जत, खालापूर, पनवेल व उरण या तेरा तालुक्यांमधील 28 धरणांमध्ये 95 टक्के जलसाठा आहे. यंदाच्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत कमालीची वाढ झाली असल्याची माहिती येथील लघू पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश धरणांनी मे महिन्यामध्ये तळ गाठला होता. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत होती. अखेर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे कोरडी पडलेली धरणे, नदी व विहीरींमध्ये काही प्रमाणात पाणी साचले. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आणि पुन्हा जून महिन्याच्या दूसऱ्या आठवड्यात पाऊस सुरु झाला. जूलै महिन्यात ही काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. परंतु, पावसाने पुन्हा जोरदार सुरूवात केली. त्यामुळे नदी, तलावासह विहीरीदेखील पाण्याने भरल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांसह कारखान्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याचा पुरवठा ही मुबलक प्रमाणात होऊ लागला आहे.
लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित 13 तालुक्यांमध्ये 28 धरणे आहेत. या धरणांद्वारे ग्रामीण व शहरी भागात पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमध्ये सध्या 95.25 टक्के जलसाठा आहे. सुतारवाडी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंध, कोंडगांव, उन्हेरे, कवेळे, भिलवले, वावा, फणसाड, घोटवडे, कलोते-मोकाशी, डोणवत, आंबेघर, उसरण, मोरबे, अवसरे, बामणोली, ढोकशेत, कुडकी, साळोख या 24 धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा आहे. श्रीवर्धनमधील कार्ले धरणात 99 टक्के पाणी आहे. अलिबागमधील श्रीगाव, उरणमधील पुनाडे आणि श्रीवर्धनमधील रानीवली धरणामध्ये 75 टक्के जलसाठा असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली आहे.
गतवर्षीच्या तुलनेने पाण्यात घट
गतवर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये 96 टक्के इतका जलसाठा होता. यावर्षी 95.25 टक्के इतका जलसाठा आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी 1.25 टक्केने घट झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. परंतु, यंदा जुलै महिन्यात पाऊस कमी पडला असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
