| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर ते महाबळेश्वर वाई सुरूर या राज्यमार्गावरील छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ते जोगेश्वरी गाडीतळदरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले डेरेदार उंच वृक्ष वादळादरम्यान धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोलादपूर पेट्रोल पंपाजवळ महाबळेश्वर रस्त्यावर दोन मोठे वृक्ष आहेत. येथून मशिदीकडे जाणार्या पायर्यांजवळ तसेच पुढील मोहल्ल्याजवळ, बँक ऑफ इंडियासमोरील मोरीजवळ, सुप्रिया चिकन सेंटरजवळ, भिलारे एसटीडी सेंटरजवळ तसेच पुढे उंचच उंच वृक्षांची दाटी तांबडीचा आवाड आणि शिवाजीनगर जनसेवा प्रशालेसमोरील मोकळ्या जागेलगत दिसून येत आहे. यानंतर जोगेश्वरी गाडीतळ आणि दि लेप्रसी मिशन हॉस्पिटल परिसरापासून जुन्या नळपाणी योजनेच्या कोसळलेल्या जॅकवेलपर्यंत मोठमोठे वृक्ष आहेत. हे वृक्ष कोसळल्यास महाबळेश्वरपर्यंतची रस्ते वाहतूक काही तासांसाठी ठप्प होण्यासोबतच रस्त्यालगतच्या टपर्या तसेच दुतर्फा उभी असणारी वाहने यांच्यासह मनुष्यहानीचा धोका उद्भवणार आहे.