इतिहासात आजपर्यंत सर्वाधिक नुकसान,सामान्य नागरिक देशोधडीला
| खेड । प्रतिनिधी ।
जुलै मध्ये खेड येथे भयंकर जलप्रलय आला आणि जिल्ह्याची आर्थिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या खेडला अक्षरशा उध्वस्त केले. इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी हानी या महापुराने केली. व्यापारी, उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक, संस्था आणि सामान्य नागरिक देखील देशोधडीला लागले. या घटनेला नुकताच एक महिना पूर्ण होत आहे. या एक महिन्यानंतर खेड हळूहळू सावरताना दिसत आहे. कटू आठवणींची भळभळती जखम मनात घेऊन खेड वासीय पुन्हा उभे राहताना दिसत आहेत.
खेडच्या इतिहासात आजपर्यंत सर्वाधिक नुकसान या महापुराने केले. कोट्यवधी रूपये इतके भयंकर व प्रचंड नुकसान महापुरामुळे झाले. यामध्ये खेड बाजार पेठ आणि सुसेरी, चिंचघर या गावातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. दुकाने आणि राहती घरे असं सर्व काही उध्वस्त करत न भरून येणारी जखम हा महापूर देऊन गेला. पूरग्रस्तांच्या मदतीला संपूर्ण महाराष्ट्र धावून आला. अन्नधान्य, कपडे, भांडीकुंडी असा मदतीचा ओघ तिसर्या दिवसापासून सुरू झाला तो थांबता थांबेना. एक महिना पूर्ण होत असताना अद्यापही मदतीचा ओघ सुरूच आहे. संकटाला तोंड देऊन त्यांच्यावर मात करून पुन्हा भरारी घेण्याचे प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. खेडचा व्यापारी शांत बसलेला नाही. बाजारपेठेत पुन्हा गजबज सुरू झाली आहे. उधारी ,उसनवारी, कर्ज या माध्यमातून व्यापार पुन्हा सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. कचर्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन दिवस-रात्र कामाला लागली आहे. शासनाच्या मदतीची प्रतिक्षा असली तरी आपण स्वतः काही तरी केले पाहिजे या जिद्दीने प्रत्येक जण एक दुसर्याला मदत करीत आहे.