भारताची इंग्लंज, नेदरलॅन्डशी लढत
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. विश्वचषकाच्या मुख्य सामन्यांपूर्वी 10 सराव सामने खेळवले जातील. भारतीय संघ इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. 30 सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये त्यांचा सामना इंग्लंडशी आणि 3 सप्टेंबरला तिरुअनंतपुरममध्ये नेदरलँडशी होणार असल्याचे सुचित करण्यात आले.
5 ऑक्टोबर रोजी विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, 10 संघ प्रत्येकी 50 षटकांचे दोन सराव सामने खेळतील. भारतातील तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमसह हैदराबादलाही सराव सामन्यांचे यजमानपद मिळाले. साखळी फेरीचे तीन सामनेही हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत. या मैदानावर पाकिस्तानचा सामना 6 ऑक्टोबरला नेदरलँडशी आणि 10 ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. दरम्यान, 9 ऑक्टोबर रोजी नेदरलँड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने असतील.
29 आणि 30 सप्टेंबर व्यतिरिक्त 2 आणि 3 ऑक्टोबरला सराव सामने खेळवले जातील. पहिल्या सराव सामन्यात बांगलादेशचा संघ श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. सर्व सामने दुपारी 2 वाजल्यापासून खेळवले जातील. या दरम्यान, सर्व संघांना 15 खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी असेल.
10 शहरांमध्ये स्पर्धा रंगणार विश्वचषकाचे सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँडचे संघ पात्रता फेरीतून या स्पर्धेत पोहोचले आहेत.
राऊंड रॉबिन स्वरूपात सामने या विश्वचषकात सर्व संघ इतर नऊ संघांबरोबर राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळतील. यापैकी गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिश संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषकावर नाव कोरले होते.