मुख्याधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
| खोपोली | प्रतिनिधी |
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेचे आरोग्य विभाग काम करत आहे. नागरिकांनीदेखील शहर स्वच्छतेची जबाबदारी आपली आहे हे ओळखून स्वच्छतेच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांनी केले आहे. शुक्रवार, दि.25 ऑगस्ट रोजी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहर स्वच्छ करण्यासाठी नुसते सुशोभिकरण चालणार नाही, तर शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहिली पाहिजेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि.25 ऑगस्ट रोजी आयोजित विशेष स्वच्छता मोहिमेस सकाळी 7 वाजता अग्निशमन कार्यालय खालची खोपोली येथून प्रारंभ करण्यात येणार आहे. बाजारपेठेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणात समाप्त होईल, अशी माहिती अनुप दुरे यांनी दिली. तसेच या विशेष मोहिमेत खोपोली शहरातील सामाजिक संघटना, नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी सहभागी होण्याचे अवाहन केले आहे.