200 अतिरिक्त वीज मीटरची व्यवस्था
| रायगड | खास प्रतिनिधी |
काहीच दिवसांनी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीजेची गरज लागते. तात्पुरती वीज जोडणीची सुविधा महावितरणने केली असून सुमारे 200 अतिरिक्त वीज मीटरची व्यवस्था रायगड जिल्ह्यासाठी केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेत अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणनेचे अधिक्षक अभियंता आय. अे. मुलानी यांनी कृषीवलशी बोलताना केले.
राज्यात बाप्पाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. विशेष करुन कोकणामध्ये घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सार्वजनिक गणेशोउत्सव मंडळ आहेत. या कालावधीत मोठ्या प्रमाणात देखावे उभारले जातात. तसेच विद्युत रोषणाई देखील करण्यात येते. यासाठी लागणारी वीजेची जोडणी घरगुती मीटरवरुन घेतली जाते. परंतु त्यामुळे काही अपघात होण्याची शक्यता असते. असे प्रकार टाळण्यासाठी महावितरणने तात्पुरती वीज जोडणी देण्याचे धोरण अवलंबले आहे.
यासाठी स्वतंत्र मीटरची व्यवस्था करण्यात येते. तसेच घरगुती दराने वीज आकार घेण्यात येतो. ग्राहकांसाठी हे अतिशय किफायतशीर आणि सुरक्षीत असल्याचे मुलानी यांनी सांगितले. गेल्या वर्षी 65 मंडळांनी यासाठी अर्ज करुन तात्पुरती वीज जोडणी घेतली होती. यंदाच्या वर्षी देखील महावितरणने अशीच योजना आणली आहे. मागेल त्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. यासाठी 200 अतिरीक्त मीटर ठेवण्यात आले असल्याकडे मुलानी यांनी लक्ष वेधले.
या कागदपत्रांची आवश्यकता
गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरीक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकीत प्रत आदी कागदपत्र आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.
दक्षता घ्या…
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचे वीज अपघात होऊ नये, यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्च दाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे आदी यंत्रणा पासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीज संच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीज संच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत कंत्राटदारांकडून करून घ्यावी. गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपत्कालीन स्थिती करिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.