आज होणार घोषणा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दि.5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. दि.19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला दि.8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड आज दि.5 रोजी होणार आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम 15 खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत. आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन अजित आगरकर संघाची घोषणा करणार आहेत. 15 जणांमध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे भारतीय क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलेय. पण रिपोर्ट्सनुसार, आशिया चषकात खेळणाऱ्या संघातीलच खेळाडू निश्चित झाले आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती काही आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकते.
भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, केएल राहुल फिट झालाय. एनसीएमधील मेडिकल टीमने केएल राहुल तंदुरुस्त झाल्याचे जाहीर केले आहे. विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याने फिटनेस चाचणी पास केली आहे. केएल राहुल आज, मंगळवारी श्रीलंकेत दाखल होणार असून भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. टीम इंडियाच्या सुपर 4 मधील सामन्यांसाठी राहुल उपलब्ध असेल. दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषखातील पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता. बेंगलोर येथे एनसीएमध्ये केएल राहुल याने फिटनेसवर काम केले. सोमवारी केएल राहुलने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली. राहुल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. विश्वचषकासाठी राहुल उपल्बध असेल. त्याची निवडही निश्चित मानली जात आहे.
2023 वनडे वर्ल्डकपसाठी संभावित 15 शिलेदार रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (रिजर्व विकेटीकपर), हार्दिक पांड्या (उपकप्तान), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी.