पनवेल | वार्ताहर |
वाशी रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यू-ट्युबवर प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमुळे एका घटनेतील मृत महिलेच्या वारसांचा शोध लागला असून, मृत महिलेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
याबाबत हकीकत अशी की, दि.22 जुलै 2021 रोजी सानपाडा ते जुईनगर रेल्वे स्टेशनदरम्यान कालू परियार नावाची 22 वर्षीय महिला रेल्वे अपघातामुळे जखमी झाली होती. सदर महिलेला वाशी रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी सायन हॉस्पिटल येथे भरती केले होते. सदर अपघातात तरुणी जखमी असल्यामुळे कालू परियार एवढेच नाव व सध्या रा. अंधेरी व मूळ रा. नेपाळी धनगडी एवढीच माहिती पोलिसांना मिळू शकली होती. वाशी रेल्वे पोलिसांच्या व मुंबईतील नेपाळी संघटनेच्या प्रयत्नांना अखेरीस यश येऊन सदरची सर्व माहिती मृत महिलेचा नेपाळ मध्ये राहणारा भाऊ नरेश गोरे आऊजी परियार याच्यापर्यंत पोहचली व त्यानंतर त्याने थेट दि.19 ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील वाशी रेल्वे पोलिस ठाणे गाठले व नमूद मृत महिला त्याची बहिणी असल्याचे सांगत त्याबाबत आवश्यक ती कागदपत्रे रेल्वे पोलिसांना सादर केली असता, पोलिसांनी खातरजमा करून नमूद महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी महिलेचा भाऊ नरेश गोरे आऊजी परियार याच्या ताब्यात दिला.