| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने एक ॲप विकसित केले आहे. या ॲपचा आधार घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना घरात बसून खत खरेदी करता येणार आहे. खत खरेदी करण्यासाठी या डिजिटल पर्यायाचा उपयोग केल्याने खत घरबसल्या आपल्या शेतावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, या ॲपचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास खत खरेदी करणे सोपे जाईल आणि खत सहज उपलब्ध देखील होऊन फसवणूक टळणार आहे.
कर्जत कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खत खरेदी प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने ‘एफएफएस’ ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताची मागणी नोंदविता येते, आपल्या शेताची माहिती भरता येते, लागवड करावयाचे पीक निवडता येते, पिकानुसार उपलब्ध सामान्य खत शिफारस पाहता येते, आवश्यक खताचे प्रमाण निवडता येते आणि अधिकृत खत विक्रेता यांची निवड करून खताची नोंद देखील शेतकरी वर्ग घरात बसून करू शकतात. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी डिजिटल खत बुकिंगचा लाभ घेण्यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईल फोन वर ‘एफएफएस’ हे ॲप डाउनलोड करून पुढील प्रक्रिया करता येणार आहे. ही प्रणाली डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांनी फार्मर आयडीच्या माध्यमातून किंवा संबंधित शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर ते शेतकरी ई-केवायसी यांचा वापर करू शकतात. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात खताची आवश्यकता लक्षात घेऊन ‘एफएफएस’ या डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी ऋतुजा नारनवर, तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे, तालुका कृषी अधिकारी गुण नियंत्रण दिनेशकुमार कोळी यांनी केले आहे.







