सुधागडचा आशिष बनला आरमानीचा शेफ
| पाली | निशांत पवार |
एखादे स्वप्न बघून ते पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगली की, ते हमखास सत्यात उतरते. सुधागड तालुक्यातील कुंभारशेत या छोट्याशा गावातील आशिष अशोक मनवी याने आपल्या स्वप्नांना बळ देत थेट दुबईत झेप घेतली आहे. बुर्ज खलिफा या जगातील उंच इमारतीमधील हॉटेलमध्ये आशिष हा शेफ म्हणून काम करत आहे. त्याच्या या कामगीरीने त्याचे आई-वडील, नातेवाईक आणि गाव चांगलच भारावून गेले आहे. आशिषचे वडील टेम्पो चालक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटूंबातील मुलगा दुबईत पोचल्याने आनंदाला पारावार उरला नाही.
आशिष म्हणतो जार्ज बर्नार्ड शॉ म्हणतात अन्नावर प्रेम करण्यासारखे प्रामाणिक प्रेम दुसरे काही नाही. आई सुद्धा म्हणायची एखादया व्यक्तीच्या मनात जागा करण्याचा मार्ग पोटातून जातो. तेव्हा मी ठरवले की जीवनात सर्वांना आपल्या हातचे चविष्ट पदार्थ खाऊ घालायचे. आई-वडीलांना चिंता होती मुलाच्या भविष्याची की आपला मुलगा काय करेल. पण लहान वयातच आशिशनेे धेय ठरवले होते की हॉटेल मॅनेजमेंट करून जगातल्या मोठ्या हॉटेल मध्ये शेफ व्हायचये. याच इच्छेने तो पेटून उठला आणि पुण्यातील डि.वाय. पाटील मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. कॉलेजची वर्षे विस्मयकारक अनुभव व ज्ञान देणारी ठरली. आयटीसी ग्रँड मराठा मुंबई येथे काम करायची संधी मिळाली. प्रचंड मेहनत, तासन तास काम केले. प्रत्येक डिशचे बारकावे शिकून घेतले. चिकाटीने, जिद्दीने तळमळीने रेसीपीज शिकून घेतल्या त्यात नाविन्यता आणल्या स्वतःच्या नवीन संकल्पना समोर ठेवल्या. ज्या रुचकर तर होत्याच परंतु त्यापेक्षा जास्त जिभेला आस्वाद आणि समाधानाचा ढेकर आणणाऱ्या होत्या. याच कौशल्याची पावती म्हणून कलर्स मराठी चॅनलवर परिपूर्ण मेजवाणी कार्यक्रमात आशिषला डिशेस सादर करण्यासाठी आमंत्रित केले गेले. त्यावेळी टिव्ही वर नाव आले आशिष अशोक मनवी! हे पाहिल्यावर माझ्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि माझ्या मनात समाधान, असे आशिषने सांगितले.
आज आशिष दुबईच्या नव्हे तर जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारतीमध्ये असणाऱ्या मिसेलीयन स्टार्स प्राप्त अरमानी हॉटेल, दुबई येथे चांगला शेफ म्हणून किचन गाजवतोय, या आधी त्याने तेथील पेरगोला डे पाईन्स, ग्रॅण्ड हयात, इटालीयन रेस्टॉरंट, पंचतारांकीत, सात तारांकीत हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम केले. दुबईत त्याला शेफ ऑफ दी इयर, एम्लॉय ऑफ द इयर अवॉर्ड मिळाले. तसेच तेथील स्पर्धेत त्याला दोन सिल्व्हर आणि एक ब्राँझ मेडल मिळाले.
दरम्यान, आशिष सारखी जिद्द आणि मेहनत घेतली की, ध्येय साध्य करता येते. आशिषचा हा यशोप्रवास अन्य तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरले यात शंका असण्याचे कारण नाही.