। पाटणा । वृत्तसंस्था ।
एका व्यक्तीने शेती विकून आलेले 39 लाख रुपये पत्नीच्या नावे केले. मात्र पत्नीने बँक खात्यात 11 रुपये शिल्लक ठेवून शेजार्यासोबत पळ काढला. बिहारची राजधानी पटनामधील बिहटा येथील ही घटना आहे.
या प्रकरणी फरार महिलेच्या पतीने पोलिसांमध्ये धाव घेतली आहे. बिहटा येथील रहिवासी बृजकिशोर सिंह याचे 14 वर्षांपूर्वी बिंदगावा येथील प्रभावती देवी हिच्यासोबत लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. दोन्ही मुलं आईसोबत बिहटा येथे भाड्याच्या घरात राहत होते, तर बृजकिशोर घरखर्च चालवण्यासाठी गुजरातमध्ये नोकरी करत होता. पत्नीच्या सांगण्यावरून बृजकिशोर याने गावची वडिलोपार्जित संपत्ती विकली आणि आलेले 39 लाख रुपये पत्नी प्रभावती हिच्या खात्ताय जमा केले. व्यवहारानंतर एक आठवड्याने बृजमोहन गुजरातहून गावी परतला. मात्र घरी पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला.
घराला कुलूप लावलेले होते आणि पत्नीचा मोबाईल फोनही नंबरही बंद लागत होता. बृजकिशोर याने घरमालकाकडे याबाबत विचारणा केली असता त्याने प्रभावती देवी पहाटे 5 वाजता घर खाली करून निघून गेल्याचे सांगितले. बृजकिशोर याने पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती गावात आढळून न आल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलीस चौकशीदरम्यान प्रभावती देवी हिच्या प्रेमप्रकरणाचा पत्ता लागला.
प्रभावती देवी हिचे शेजारी राहणार्या तरुणाशी सूत जुळले होते. या तरुणासोबतच ती पळून गेली. पळून जाण्यापूर्वी प्रभावती हिने 26 लाख रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले आणि 13 लाख रुपये चेकच्या मदतीने खात्यातून काढले. सध्या तिच्या खात्यात फक्त 11 रुपये शिल्लक असल्याचे पोलिसांनी सांगितले.