एका रात्रीत लाखोची उलाढाल ?,
| अलिबाग | प्रतिनिधी |
गणेशोत्सवात जागरण करून जुगार खेळण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथे रस्त्याला लागूनच गेले काही दिवस जुगार सुरु असल्याची चर्चा होती. अखेर नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच बुधवारी (दि.11) रात्री 1 वाजता पोलिसांनी कारवाई करीत 9 आरोपींसह 5 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी गुरुवारी दुपारी पोयनाड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनिअम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सवामध्ये जागरण करण्यासाठी मनोरंजन म्हणून जुगाराकडे पाहिले जात होते. मात्र मनोरंजन म्हणून असलेला खेळ व्यवसाय बनू लागला आहे. दोनशे रुपयांपासून हजार, दोन हजार रुपयांची बोली लावून जुगार खेळ खेळला जात असल्याचा प्रकार बुधवारी केतकीचा मळा येथे आढळून आला . 25 दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्याच्या आदल्या दिवशी एका बाजूला आर्केस्ट्रा ठेवण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला गॅलरीमध्ये पैशाने जुगार खेळण्याचा धंदा राजरोसपणे सुरु होता. संध्याकाळी सातनंतर सुरु झालेल्या या जुगाराच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत बरीच गर्दी झाली होती.
हाशिवरे पोलीस चौकी बंद
पोयनाड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हाशिवरे येथे पोलीस चौकी बांधण्यात आली आहे. या परिसरातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चौकी बांधली आहे. मात्र बुधवारी सायंकाळपासून जुगार सुरु असताना ही चौकी बंद स्थितीत असल्याची दिसून आली. पोलीस ठाण्यातील विद्युत सेवा बंद करण्यात आली होती. प्रवेशद्वाराला कडी लावली होती. तसेच चौकीतील प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. त्यात हवालदार टीशर्ट व हाफ पॅन्टमध्ये झोपला असल्याचे दिसून आले.
अवैध धंद्यांना सत्ताधाऱ्यांचे राजकीय पाठबळ ?
केतकीचा मळा येथील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी रात्री एका बड्या राजकीय नेत्यानेही उपस्थिती लावली असल्याची चर्चा सुरु होती. याच ठिकाणी राजरोसपणे जुगारही सुरु होता. त्यामुळे अवैध धंद्यांना सत्ताधाऱ्यांचे राजकीय पाठबळ असल्याची चर्चाही सध्या सुरु आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल
केतकीचा मळा येथे सुरु असलेल्या जुगाराबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळविताच त्यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अशोक साडे, समीर पाटील, अनिल म्हात्रे, दिनेश गोठवणकर, महेंद्र धसाडे, जितेंद्र कदम, राहुल पाटील, प्रसाद पाटील, अशोक पाटील यांच्यावर गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी 12 जणांचा समावेश असून ते पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.