वन विभागाने गस्तीत केली वाढ
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागांव येथील शास्त्रीनगर-समीरा परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आहे. या घटनेनंतर अलिबागमधील वन विभागाने गस्तीत वाढ केलेली आहे. तसेच, नागरिकांमध्ये जनजागृती सुरु केली असून खबरदारी घेण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.
समीरा परिसरात रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्या असल्याचे रात्रीपासून सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. अलिबागचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागांव परिसरात रात्री व पहाटेच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविली आहे. गावांतील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. वनविभागामार्फत परिसरात रेकी सुरु केली आहे. मात्र या भागात बिबट्याचा वावर आढळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते.
नागाव परिसरात वाघ आढळून आल्याची माहिती रात्री दोन वाजण्याच्या सुमारास समजली. गावांतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. गस्त वाढविली आहे. शोध अजूनही सुरु आहे. परंतु कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही करण्यात येत आहे.
नरेंद्र पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग