| गोवे-कोलाड | वार्ताहर |
कोलाड-रोहा मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सद्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी वाहनांची कायम वर्दळ असून सातत्याने धुळ उडत असल्याने स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील कोलाड नाका हे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असुन येथे बाजूबाजूच्या 60 ते 70 गावे, वाडया, वस्त्या येथील असंख्य नागरिक ये-जा करीत असतात, तसेच येथे शाळा, कॉलेज, असल्यामुळे असंख्य विद्यार्थी तसेच धाटाव औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार, रोहा, अलिबाग, मुरुडकडे जाणारे असंख्य प्रवाशी याच मार्गाने प्रवास करीत असतात. यामुळे येथे प्रचंड मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. कोलाड-रोहा रस्त्याचे काम गेल्या वर्षांपासून सुसाट झाले असले, तरी कोलाड पासून रोहाकडे जाणारा मुख्य चौकातील रस्त्याचे काम हे नाल्यांचा कामामुळे रखडले आहे. या ठिकाणी अपघात देखील झाले आहेत. मंगळवारी या रस्त्यावरून वाहन जात असताना वाहनाच्या चाका खालून दरड उडून तो एका मुलीच्या डोक्याला लागून ती मुलगी जखमी झाली. तसेच, आजूबाजूला असणाऱ्या दुकानात ही दगडं उडून दुकानातील काचा फुटून दुकानदारांचे ही मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
पावसामुळे या रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. आता पावसाळा संपल्याने लवकरक काम सुरु करुन नागरिकांना होणाऱ्या त्रासातुन सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे.