पुणे येथील प्रयोगशाळेतून मिळाली माहिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
नागांवसह काही भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मिळालेल्या पायांच्या ठशांचे चित्र पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. हे ठसे बिबट्याचेच असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर एकटे फिरू नये असे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसापूर्वी नागावमधील समिरा परिसरात बिबट्या आढळून आल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. सोशल मिडीयावरदेखील ती व्हायरल झाली. सुरुवातीला अफवा वाटत होती. परंतु रायवाडी येथील एका तरुणाला रात्रीच्यावेळी समुद्रकिनारी दगडाजवळ उभा असलेला, त्यानंतर सहाण येथील परिसरातही बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले. त्याचा वावर या परिसरात वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नागांव परिसरातील एका शेतकऱ्याच्या बकऱ्याही उचलून नेल्याची माहिती समोर येत आहे. वनविभागाने गस्तीत वाढ केलीली आहे. तसेच, तीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या पायांच्या ठशांचे चित्र पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले. हे ठसे बिबट्याचेच असल्याची शक्यता याविभागाने वर्तविली आहे. मात्र, अजूनही बिबट्या सापडलेला नाही, असे वनविभागाने सांगितले आहे.
फणसाडमधून आल्याचा अंदाज मुरुड तालुक्यातील फणसाड हे एक मोठे अभयारण्य आहे. या अभयारण्यातून बिबट्या आला असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून एकटे बाहेर पडू नये, हातात काठी ठेवावी, रात्रीच्यावेळी प्रवास करताना मोबाईलमधील गाणी ऐकत जावे, जेणेकरून आजूबाजूला असलेला बिबट्या वेगवेगळ्या आवाजामुळे हल्ला करणार नाही, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.