| पुणे | प्रतिनिधी |
मराठा समाजाला षडयंत्र करून सत्तर वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. मराठ्यांच्या जागेवर नोकरीला लागलेल्या सगळ्यांना बाहेर काढून त्यांची सपंत्ती जप्त करावी, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे बोलत होते. मराठा आरक्षणाविषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आरक्षण नसल्याने समाजाचे मोठे नुकसान होण्याबरोबर समाजविकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे.
सत्तर वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर जगाच्या पाठीवर मराठा समाज सर्वात प्रगत जात ठरली असती. मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी आणि पुरावे नसल्याचे कारण देत आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. एकीने लढा दिल्यानंतर आणि आंदोलन केल्यानंतर जिल्हा जिल्ह्यात नोंदी कशा सापडू लागल्या असा सवाल त्यांनी केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी भान ठेवावे अन्यथा समाज त्यांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. विरोध करणाऱ्यांसाठी आम्हाला हातात दगड घ्यायची पण गरज नाही कारण आम्हा शेतकरी व कष्टकऱ्यांचा हातच त्यासाठी पुरेसा आहे. 1 डिसेंबर पासून गावोगावी साखळी उपोषण सुरू करा आणि 24 डिसेंबरपर्यंत सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, मराठा समाजातील मुलांचे कल्याण व्हायला लागले की, अशा खोट्या पुड्या सोडल्या जातात. यामागे कोण आहे हे राज ठाकरेंनी शोधून काढावे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.