रसायनी | वार्ताहर |
रांची, झारखंड येथे 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर रोजी झालेल्या 52 व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल शत्रुघ्न माळी हिने रौप्यपदकाची कमाई केली आहे. स्नेहलचे राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेतील तिसरे पदक असून, कुरुक्षेत्र येथे सुवर्णपदक, पनवेल येथे कांस्यपदक आणि रांची येथे रौप्यपदक पटकाविले आहे.
स्नेहल ही रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या असून, तिने सायकलिंग स्पर्धेत देशासह खारघरचे नाव उज्वल केले आहे. तिला फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे श्री. साठे, जिजामाता पुरस्कार विजेती दिपाली निकम, शिवछत्रपती पुरस्कार विजेती दिपाली शिळदणकर आणि ती सध्या सराव करत असलेले महाराष्ट्र संघ प्रशिक्षक दर्शन बारगुजे (फिनिक्स सायकलिंग अकॅडमी पुणे) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. स्नेहलच्या या यशामागे प्रशिक्षक व विशेष करून तिची आई व वडिलांचा सिंहाचा वाटा आहे, असे तिने सांगितले. या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.