। खांब-रोहा । वार्ताहर ।
सध्या सुरू असलेला श्रावण महिना व त्याच्यासोबत चालू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळात ग्रामीण भागात मासेमारी करणार्यांसाठी जणू सुगीचे दिवस आले असल्याचे पहावयास मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्याबरोबर सुरुवातीला पावसाचे पाणी ठिकठिकाणी साठल्यामुळे नदीप्रवाहातून आलेले मासे मारण्यासाठीची एकच लगबग ग्रामीण भागात दिसून येत होती.तर, सध्या श्रावण महिन्यातदेखील मासेमारीला सुगीचे दिवस आले असल्याचे पहावयास मिळत आहे. यंदाच्या मोसमी पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त साधत हळूहळू बरसायला सुरुवात केली. तर, पुढे बरेच दिवस उलटून गेले तरी मुसळधार स्वरुपात व माशांची वल्गन चढेल अशा प्रकारचा समाधानकारक पाऊस न पडल्याने खवय्यांची मात्र निराशाच झाली होती. तर, खवय्ये आपली मासे खाण्याची इच्छा भागविण्यासाठी मिळेल ते डबके, नदी, नाले अशा ठिकाणी मिळतील ते मासे पकडून आपली मनाची इच्छा पूर्ण करीत असल्याचे दिसून येत होते.
सध्या श्रावण महिना सुरू असून, कधी धो धो पाऊस तर ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील युवा वर्गाला मात्र मासेमारीसाठी सुगीचे दिवस आले असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे सध्या काही जण़ाचे कामधंदेही बंद असल्याने एक विरंगुळा तसेच पोटापाण्याची व्यवस्था म्हणून ग्रामीण युवा वर्ग मात्र मासेमारी करताना दिसत आहेत.