नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याचे आमदार यांच्या गावासमोरून साळोख गावाकडे जाणारा 6 किलोमीटर लांबीचा रस्ता खड्डेमय बनला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविण्यात आलेला हा रस्ता अनेक वर्षे दुरुस्त केला नाही आणि त्यामुळे रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे.दरम्यान,गणेशोत्सव पूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पोसरी गावापासून साळोख गावाकडे जाणारा रस्ता आहे.पोसरी ते साळोख या सहा किलोमीटर लांबीच्या अंतरावर सात गावे असून यापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले होते.त्यानंतर अनेक वर्षे या रस्त्याची डागडुजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केली नाही.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक असताना ती झाली नाही.त्यामुळे पुढे या रस्त्यावर असंख्य ठिकाणी रस्ता अवजड वाहने जाऊन दबला आहे.त्यात या भागातील शेती दुबार पीक घेणारी असल्याने त्या भागातील शेतीत पाणी बाराही महिने असते.परिणामी जमीन ओली राहत असल्याने मातीचा भराव टाकून बनलेल्या हा रस्ता दरवर्षी दबला जातो.आणि या रस्त्याने नव्याने दुचाकी घेऊन येणार्या वाहन चालक यांना याची कल्पना नसल्याने दुचाकींना अपघात होत असतात.त्यात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या जमिनीमध्ये कालव्याचे पाणी असल्याने कायम रस्त्याच्या आजूबाजूला हिरवाई फुललेली असते.त्यामुळे पोसरी पासून साळोख पर्यन्त रस्त्यावर खड्डे लगेच पडत असतात.
या रस्त्याच्या आजूबाजूला तिवरे,आरवंद, इंजिवली,वरई,दहिगाव,साळोख,ही गावे असून मोठी लोकवस्तीची गावे आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची देखील रहदारी असते.ती लक्षात घेता रस्त्याची रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वरई ग्रामपंचायतचे माजी सरपंच शंकर भुसारी यांनी केली आहे.
गणेशोत्सव पूर्वी रस्त्याची डागडुजी करणे आवशयक असून जिल्हा परिषदेने करावी.त्याचवेळी रस्त्याचे काम करणार्या ठेकेदारावर देखभाल दुरुस्ती न केल्याप्रकरणी कारवाई करावी.त्या ठेकेदाराने दुरुस्ती आपल्या देखभाल दुरुस्ती कार्यकाळात केली असती तर आम्हला खड्ड्यातून प्रवास करावा लागला नसता.
दीपक धुळे-माजी उपसरपंच
आम्ही बांधकाम विभागाकडून तालुक्यातील पावसाळ्यात नुकसान झालेल्या सर्व रस्त्यांची पाहणी केली आहे.त्याचवेळी आम्ही जिल्हा परिषदेकडे रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सादर केले आहेत.
प्रल्हाद गोपणे-प्रभारी,उपअभियंता