जमीन संपादनाला नागरिकांचा विरोध
। उरण । प्रतिनिधी ।
सिडकोने चाणजे, नागाव, केगाव, बोकाडवीरा, पागोटे व फुंडे येथील गावातील 1 हजार 327 सर्व्हे नंबर मधील शेतकर्यांच्या जमीनी संपादनासाठी 22 डिसेंबरला सुधारित अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेला शेतकर्यांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. यासाठी शनिवारी सायंकाळी नागावमध्ये झालेल्या बैठकीत सिडको विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिडको विकासाच्या नावाखाली कोणताही प्रकल्प किंवा योजना जाहीर न करता तसेच शेतकर्यांना विश्वासात न घेता सिडकोने एकतर्फी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाला आहे. सिडकोच्या पहिल्या अधिसूचनेला यापूर्वीच शेतकर्यांनी कडाडून विरोध केला आहे. तरी ही सिडकोने नव्याने अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये वाढीव सर्व्हे नंबर समाविष्ट करण्यात आले आहेत.
या जमीनीवर शेतकर्यांची 70-80 वर्षांपूर्वीची पारंपरिक शेत घरे आहेत. तसेच, उरणमध्ये येऊन नोकरी व्यवसायानिमित्त स्थायीक झालेल्या नागरिकांनीही आपल्याला राहण्यासाठी या जमिनीवर घरे बांधली आहेत. सिडकोने याचा विचार न करता यातील बहुतांश जमीनी संपादीत करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सिडकोच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. सिडकोला द्रोणागिरी नोडमध्ये साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटपासाठी जमिन कमी पडत आहे. त्यासाठी चाणजे, नागाव, केगाव आणि इतर गावातील जमीनी नव्याने संपादीत करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. परंतु राहती घरे असतांना जमीनी संपादीत केल्या जात असल्याने शेतकरी आणि घर मालकांनी या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शविला आहे. तशा हरकती सिडकोकडे नोंदविण्यात आल्या आहेत. असे असतांनाही सिडकोकडून या विभागात जमिनीचे संपादीत करीत असल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त करीत सिडको विरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे.
पुन्हा संघर्ष होणार.
सिडकोच्या अधिसूचनेला लेखी हरकती अर्ज घेऊन 4 जानेवारीला सकाळी 11 वाजता सिडको भवन बेलापूर येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला जेष्ठ नेते सुरेश ठाकूर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील, सिडको बाधित प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष कॉ. भूषण पाटील व सचिव अरविंद घरत, विजय पाटील, रामचंद्र म्हात्रे, काका पाटील तसेच नागाव, केगाव व म्हातवली ग्रामपंचायतीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.