| माथेरान | वार्ताहर |
पर्यटकांसह स्थानिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्वस्त,सुरक्षित मिनीबस सेवा माथेरानमध्ये सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून कर्जत-माथेरान मार्गावर धावणाऱ्या मिनीबस जीर्ण झाल्याने येथे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत आहे. याच बरोबर घाट मार्गात बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे याठिकाणी नवीन मिनीबस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबई-पुण्यापासून जवळ असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानमध्ये पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. दळणवळणासाठी मिनीट्रेन, खासगी वाहनांचा पर्याय असला तरी कर्जत-माथेरान मिनीबस सेवेलाही पसंती मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, नोकरदार मंडळी, स्थानिक तसेच पर्यटक स्वस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी मिनीबसला प्राधान्य देत आहेत. 2008 मध्ये कर्जत – माथेरान ही महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाची मिनीबस सेवा सुरू झाली.
मिनीबस रद्द झाल्याने दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांची येथे गैरसोय होते. महिलांना तिकीट दर निम्मे केल्याने येथे प्रवासी संख्या वाढली आहे. मात्र वारंवार बस नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसत खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन माथेरानकरांसाठी नवीन मिनी बस उपलब्ध व्हावी तसेच फेऱ्या वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन मिनीबसची चाचणी घेतली आहे.घाटमार्गातील वळण क्षेत्रात कोणतीही अडचण येऊ नये याचे परिक्षणही केले आहे. दोन अशोका लेलैंड बसची ऑर्डर दिली असून बांधणी सुरू आहे. या गाड्या लवकरात लवकर येथे आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
देवानंद मोरे,
आगार व्यवस्थापक