| पनवेल | वार्ताहर |
कामोठयात नागरिकांना मंगल कार्य आणि सामाजिक उपक्रमांच्या आयोजनासाठी सभागृह भाडेतत्त्वावर घ्यावे लागत असल्याने नागरिकांनी सिडकोकडे समाजसेवा केंद्राची मागणी केली होती. त्यानुसार सिडकोने सेक्टर 21 येथे सुमारे चार कोटी खर्च करून बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम 2018 मध्ये पूर्ण केले आहे.
या इमारतीच्या तळमजल्यावर ग्रीन रूम, कार्यालय, स्वयंपाक गृह, बहुउद्देशीय सभागृह आहे.पहिल्या मजल्यावर सांस्कृतिक वर्ग, लहान मुलांची कार्यशाळा, डॉक्टरांच्या खोलीची व्यवस्था आहे. तसेच दुसर्या मजल्यावर इनडोअर खेळ,पुस्तकालय व कार्यशाळा आहे.
एकता सामाजिक संस्थेने समाजसेवा केंद्र लोकांसाठी उपलब्ध करण्यासाठी मागील सात-आठ वर्षापासून सिडको तसेच पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आहे. 2019 विधान सभा निवडणूक पूर्वी तत्कालीन सिडको अध्यक्षांनी उद्घाटन करूनही अद्याप हे केंद्र बंद असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कामोठे येथील समाजसेवा केंद्र सिडकोने पनवेल महानगरपालिकेला नुकतेच हस्तांतरित केले आहे. हे केंद्र नागरिकांना मंगलकार्य आणि सामाजिक कार्यासाठी देण्यासाठी महानगरपालिकेचे धोरण निश्चित झाल्यावर खुले करण्यात येणार आहे.
वैभव विधाते, उपायुक्त,
पनवेल महानगरपालिका
समाजसेवा सेवा केंद्र धूळ खात पडून आहे. पनवेल महानगरपालिकेने या केंद्राचे लोकार्पण करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची गरज आहे. केंद्र सुरू करण्यासाठी एकता सामाजिक संस्थेने सतत पाठपुरावा केला आहे.
अमोल शितोळे, अध्यक्ष
एकता सामाजिक संस्था