नागरिकांमध्ये घबराट
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात बुधवारी (ता.17) रात्री तीन रानडुक्करे शिरली होती. येथील मराठा समाज हॉल जवळ भर वस्तीत ही रानडुक्करे मुक्त संचार करताना स्थानिकांनी पाहिली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पाली शहर सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सरसगडावर व पायथ्याशी रानडुक्करांचा वावर आहे. मात्र ही रानडुक्करे कधी शहराच्या एवढ्या आतमध्ये शिरली नव्हती. शिवाय जिथे डुक्करे आली होती तो भाग किल्ल्यापासून दूरवर आहे. व सर्व बाजूने मानवी वस्तीने वेढलेला आहे. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. येथील माजी वनपाल व रहिवासी रवींद्र नागोठकर यांनी सर्वप्रथम ही डुक्करे रात्री येथील परिसरात फिरताना पाहिली व लागलीच त्यांनी आजूबाजूच्या लोकांना यासंदर्भात माहिती देऊन सतर्क केले. त्यानंतर सर्व रहिवाशांनी घराचे दरवाजे लावून घेतले. यातील दोन रानडुक्करे मोठी तर एक रानडुक्कर छोटा होता. अनेकजण घरातील खिडकी व गच्चीवरुन या डुकरांना पाहत होते. त्यानंतर ही डुक्करे येथील गुप्ता समाज भवन च्या परिसरात फिरत होती. नंतर मात्र ती कुठे गेली ते माहिती नाही. मात्र पुन्हा ही डुकरे मानवी वस्तीत येतील का अशी भीती लोकांना वाटत आहे.
रात्रीच्या वेळी नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. अन्न व पाण्याच्या शोधात किंवा भरकटुन ही डुक्करे मानवी वस्तीत येण्याची शक्यता असू शकते. शिवाय जंगलातील वणवे देखील एक कारण असू शकते. भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे हे डुक्कर इकडेतिकडे पळत होते.
रवींद्र नागोठकर, माजी वनपाल व स्थानिक रहिवासी
मानवी वस्तीत रानडुक्करांचा वावर धोकादायक आहे. खासकरून लहान मुले व वृद्धांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. वनविभाग व स्थानिक प्रशासनाने याबाबत काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जयवंत शिंदे, स्थानिक रहिवासी
ही खरंच रानडुक्करे होती का याची शहानिशा करावी लागेल. तरीही नागरिकांनी रात्री फिरताना सावधानता बाळगावी. तसेच कोणीही त्यांच्या वाटेत येऊ नये. रानडुक्करे दिसल्यास वनविभागाला संपर्क करावा.
विकास तरसे, वनक्षेत्रपाल, पाली-सुधागड







