सहा गावांतील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
| तळा | वार्ताहर |
चरई खुर्द नदीच्या पात्रात दवाखान्यातील जैववैद्यकीय कचरा टाकण्यात आला असून, यात वापरलेल्या सीरिजचा समावेश आहे. येथूनच सहा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरांसाठी आणि शेतीसाठीदेखील या नदीच्या पात्रातील पाणी वापरले जात असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
23 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास एका राखाडी रंगाच्या इको कारमधून चरई खुर्द गौळवाडी येथील नदीपात्रात हा जैववैद्यकीय कचरा टाकण्यात आला असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यावेळी ही घटना उघड झाली. या नदीवर चरई गौळवाडी, बेलघर खैराट, चरई खुर्द, वृंदावन, उसर खुर्द या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. दुपारी तीनच्या सुमारास परिसरात कोणीही नसताना त्याचा फायदा घेत अनोळखीने वापरलेल्या सुया, ग्लोहव्ज, वापरलेली इंजेक्शन, सिरीज आणि इतर साहित्य थेट नदीपात्रात टाकले आहे. हा कचरा कोणी टाकला याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी जे साहित्य आहे, त्यावरील बॅच नंबरवरून हे साहित्य नेमक्या कोणत्या ठिकाणचे आहे, याचा शोध घेऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी चरई खुर्द ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे