। पनवेल । वार्ताहर ।
रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेऊन बनावट जॉयनिंग लेटर आणि ओळखपत्रे देऊन फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील आरोपी प्रियांका ऊर्फ पिंकी जाधव हिच्याविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी केल्याने यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमेय अनिल घाग हे सेक्टर 21, जुईनगर येथे राहत असून ते सरकारी नोकरीच्या शोधात होते. त्यांना पिंकी ऊर्फ प्रियांका मनोहर जाधवची रेल्वेतील अधिकार्यांशी ओळख असून, अनेक लोकांना नोकरीस लावले असल्याचे समजले. यानंतर पिंकीने रेल्वेत क्लार्कची नोकरी लावण्यसाठी दहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून कागदपत्र घेतले. यानंतर लगेचच अमेय यांनी थाडे पैसे ट्रान्सफर केले. ऑगस्ट 2022 मध्ये व्हॉट्सअॅपवर रेल्वेचे लेटरहेड असलेले रिपोर्टिंग लेटर पाठवले. यावेळी रेल्वेत नोकरी लागणार असल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी उरलेले पैसे पाठवले. ऑफर लेट दिल्यानंतर तीन संबंधिताची सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली. काही दिवसांनी पिंकी यांनी रेल्वे विभागाचे ओळखपत्र, कमर्शियल क्लार्क लिहिलेले व सही शिक्का असलेले ओळखपत्र दिले.
ऑगस्ट 2023 मध्ये अमेय लोकलने जात असताना कोपरखैरणे येथे टीसीने त्यांना अडवून तिकिटाबाबत विचारणा केली. त्यावेळी रेल्वेचे ओळखपत्र दाखवले असता ते बनावट असल्याचे टीसीकडून सांगण्यात आले. टीसीने दंड आकारला आणि वाशी लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी जबाब नोंदवला. यावेळी प्रियंका ऊर्फ पिंकी जाधवशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न दिल्याने अखेर नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.