। रायगड । खास प्रतिनिधी ।
टाळी एका हाताने वाजत नाही. घटनेची पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत घाईघाईने प्रतिक्रिया देणे हे एखाद्यावर अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात एसआयटी नेमलेली आहे. त्यातून सत्य काय ते पुढे येईल, असे म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. चंद्रकात पाटील हे माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ, लोणेरे येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
कल्याणमधील भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी (दि.2) उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली होती. सदर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील समोर आला असून, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गोळीबारात शिंदे गटाचे महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना एकूण सहा गोळ्या लागल्या आहेत.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाच्या अंतर्गत विकासासाठी आवश्यक, असे प्रस्ताव तयार करावेत. या सर्व प्रस्तावाना शासनस्तरावरून मंजुरी देण्यात येईल. तसेच विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तंत्रशास्त्र विद्यापीठाचे महत्त्व खूप मोठे आहे. पुढीलवर्षी विद्यापीठांतर्गत किमान 3 हजार विद्यार्थी जगातल्या वेगवेगळ्या देशात पाठविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे 25 वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा येथे घेण्यात आली याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. खेळामध्ये सर्वांनी एकमेकांना समजावून घेणे आवश्यक असते. सर्व खेळाच्या मैदानासाठी आवश्यक असलेला निधी देण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न केला जाईल. मुलींच्या वसतिगृहासाठी तसेच खेळांच्या मैदानासाठी आवश्यक निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे एक आदर्श विद्यापीठ व्हावे, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती जोपासावी व चालना देऊन येथे राष्ट्रीय स्तरावरचे क्रीडांगण तयार करावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व राष्ट्रीय स्तरीय खेळ येथे आयोजित करता येतील.