| पनवेल | प्रतिनिधी |
समाजात कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले जाईल. आबालवृद्ध व महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेष खबरदारी घेतली जाईल. समाजात शांतता व सुरक्षित वातावरण टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून विशेष उपायोजना करण्यात येतील. परिमंडळ 2 कार्यक्षेत्रात राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी घेतली जाईल, असे प्रतिपादन परिमंडळ 2 चे नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले.
परिमंडळ 2 पोलीस उपायुक्तपदी मंगळवारी (दि.6) विवेक पानसरे यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी ते बोलत होते. लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्तपदी तर परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची परिमंडळ 1 उपायुक्तपदी बदली केली आहे. मंगळवारी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी परिमंडळ 2 च्या पनवेल कार्यालयाची सूत्रे विवेक पानसरे यांच्याकडे सुपूर्द केली आणि परिमंडळ 1 कार्यालयाचा पदभार स्वीकारला.
याप्रसंगी पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, पोर्ट विभाग नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहुल पाटील, पनवेल शहर वपोनि नितीन ठाकरे, पनवेल तालुका वपोनि अनिल पाटील, खांदेश्वर वपोनि चंद्रकांत लांडगे, कामोठे वपोनि अजय कांबळे, खारघर वपोनि राजीव शेजवळ, कळंबोली नवनिर्वाचित वपोनि राजेंद्र कदम, तळोजा वपोनि अविनाश काळदाते, न्हावाशेवा नवनिर्वाचित वपोनि राजेंद्र कोते, उरण नवनिर्वाचित वपोनि सतीश निकम, वपोनि अशोक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्यासह परिमंडळ 2 कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी, अंमलदार आदींनी पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांचे स्वागत केले.