माजी आमदार अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश
| रायगड | आविष्कार देसाई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रायगडच्या राजकाणात चांगलाच डाव टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे थोरले बंधु माजी आमदार अनिल तटकरे यांना आपल्या पक्षात घेतले आहे. शरद पवार यांनी राजकीय पटलावर फेकलेल्या या सोंगट्यांमुळे अजित पवार विशेष करुन खासदार तटकरे यांना एक प्रकारे शह दिल्याचे बोलले जाते. अनिल तटकरे यांना सामिल करुन घेतल्याने इंडिया आघाडी मजबुत झाली आहे.
राज्याच्या राजकारणात सातत्याने नवनवीन घटना घडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे विविध नेत्यांचे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम जोरदार होत आहेत.
विविध तपास यंत्रणांच्या दहशतीमुळे सध्या भाजपामध्ये बड्या नेत्यांचे इनकमींग सुरु आहे. कोणाता नेता हा भाजपामध्ये प्रवेश करतो. याकडेच सर्वांचे लक्ष लागले असताना बुधवारी रायगडच्या राजकारणात फार मोठा भुकंप झाला आहे. खासदार तटकरे यांचे थोरले बंधू अनिल तटकरे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल तटकरे यांच्या प्रवेशावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, आमदार सुनील भुसारा, विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार गटासह खासदार तटकरेंना हा फार मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.
तटकरे कुटुंबीयांमध्ये 2019 पासून मतभेद निर्माण झाले आहेत. तत्पूर्वी शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यात तडजोड झाल्याची चर्चा होती. मात्र, ती जास्त काळ टिकली नव्हती. रायगडच्या राजकारणात दोनच नेत्यांच्या भोवती वलय आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाजपा विरोधात मोठी नाराजी पसरली आहे. त्यांची धोरणे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, नोकरदार, दलित, मुस्लीम यांच्या विरोधातील आहेत. त्यामुळे भाजपा विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष खदखदत आहे. त्याच भाजपाच्या कमळावर खासदार तटकरे स्वार झाल्याने त्यांनी सर्वच घटकांची नाराजी ओढून घेतल्याचे दिसते.
खासदार तटकरे आणि अनिल तटकरे या दोघांमध्ये आधीचपासूनच मतभेद असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. खासदार तटकरेंनी अनिल तटकरेंसह त्यांच्या कुटूंबाला नेहमीच मागे सारण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही कुटुंबात कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. तसेच अनिल तटकरे यांचे चिरंजीव अवदुत तटकरे यांनी भाजपामध्ये या आधीच प्रवेश केला आहे. तेथे त्यांचे म्हणावे तसे राजकीय पुनर्वसन झाले नसल्याने ते भाजपा पक्षश्रेष्टींवर नाराज असल्याची अलिकडेच चर्चा होती. त्यामुळे वडील अनिल तटकरे हे शरद पवार गटात गेल्याने अवदुत तटकरे कोणता निर्णय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
2009 साली झालेल्या पेण विधानसभेच्या निवडणुकीत अनिल तटकरे हे अपक्ष निवडणुक लढले होते. त्यावेळी त्यांना 49 हजार 992 मते (28.13 %) मिळाली होती. शेकापचे धैर्यशिल पाटील हे 60 हजार 757 मते (34.19 %) मते मिळवत विजयी झाले होते, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे रविंद्र पाटील होते. त्यांना 53 हजार 141 मते (29.09 %) मिळाली होती. यामध्ये अनिल तटकरे त्यांचे एकट्याचे योगदान नसले तरी अनिल तटकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्याचा फायदा निश्चितपणे शरद पवार गटाला होणार आहे.
शरद पवार यांनी अनिल तटकरे यांना पक्षात घेतल्याने खासदार तटकरे यांच्या पुढे घरातुनच पुन्हा एकदा आव्हान उभे राहीले आहे. खासदार तटकरे यांच्यासाठी राजकीय पटलावरील खेळ आता सोपा राहीलेला नाही. त्यामुळे शरद पवारांच्या या खेळीला खासदार तटकरे हे कसा काटशह देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.