अपंग विद्यार्थ्यांना स्वतंत्र लेखनिक; 2964 विद्यार्थी देताहेत परीक्षा
| नेरळ । प्रतिनिधी ।
माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची दहावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. कर्जत तालुक्यात दहा केंद्रांवर परीक्षा सुरू केली असून 2964 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. कर्जत या मुख्य केंद्रावर तीन दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. त्या तिन्ही विद्यार्थ्यांची शिकण्याची प्रबळ इच्छा लक्षात घेऊन त्यांच्या शाळेने लेखनिक म्हणून प्रत्येकी एक असे तीन लेखनिक दिले आहेत.
माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्याकडून आज 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत परीक्षा घेतली जात आहे. कर्जत तालुक्यात आजपासून सुरू झालेली परीक्षा तालुक्यातील विविध भागातील दहा केंद्रांवर सुरू झाली आहे. कर्जत शिक्षण विभाग यांच्याकडून मुख्य परीक्षा केंद्र कर्जत शहरातील अभिनव शाळा येथे असून तेथे 852 विद्यार्थी परीक्षा देत आहे. त्याचवेळी चौक केंद्र येथे 400 विद्यार्थी, नेरळ विद्या मंदिर शाळा केंद्र 213, तर याच केंद्रात उर्दू माध्यम 85 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर नेरळ येथील एल.ए.ई.एस. येथील केंद्रावर 165 विद्यार्थी, तर नेरळ हाजी लियाकत स्कूल या केंद्रावर 165 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पोशिर येथील श्रमजीवी विद्यालय येथील केंद्रावर 198 विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर कडाव येथील श्री गजानन विद्यालय येथे 294 विद्यार्थी तसेच, कशेले येथील भाऊसाहेब राऊत विद्यालय येथील केंद्रावर 389 विद्यार्थी आणि पाथरज येथील शासकीय आश्रमशाळा केंद्र येथे 145 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. माथेरान येथील प्राचार्य गव्हाणकर हायस्कूल येथील केंद्रावर 58 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दहावीचा आज पहिला पेपर असल्याने मोठ्या प्रमाणात पालक वर्ग आपल्या पाल्यांना घेवून परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. सकाळी साडे दहा वाजता विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आले. त्या आधी सर्व विद्यार्थ्यांना शालांत परीक्षा मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या सूचना यांची माहिती ध्वनिक्षेपक यांच्याकडून देण्यात आली. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर बूट घालून येऊ नये, मोबाईल फोन घेवून येऊ नये, इलेक्ट्रिक घड्याळे, स्मार्ट वॉच घालून येऊ नये, लिखाण साहित्य शिवाय कोणत्याही वस्तू सोबत घेवून येऊ नये, हाफ शर्ट घालून यावे, फुल बाह्यांचा शर्ट घालून येऊ नये अशा सूचनांची माहिती देण्यात आली.
मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या कर्जत अभिनव शाळा येथे शिक्षण विभागाकडून नलिनी साळोखे या मुख्य परीरक्षक असून त्यांच्या सहकार्य करण्यासाठी उपपरीरक्षक म्हणून हिराचंद म्हात्रे यांच्यावर जबाबदारी आहे. परीक्षा काळात प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त असून प्रत्येक केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहचवण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने नेमलेले शिक्षक हे पोलिसांच्या बंदोबस्तमध्ये आणल्या जात आहेत, तर कॉपी विरोधी मोहीम राबविली जात असून भरारी पथके तालुक्यातील सर्व केंद्रावर जागता पहारा देत आहेत.