| उरण | वार्ताहर |
पाडेघर-गव्हाण फाटा दरम्यानच्या 3-4 कि. मि. परिसरात महामार्गावर प्रचंड प्रमाणात धुळ आणि माती पडलेली असते. मातीच्या डम्परमुळे आणि इतर वाहनांमुळे तसेच बाजूच्या क्रशर-दगडखाणीमुळे धुळ आणि माती महामार्गावर येत असते. त्यावरून 24 तास वाहने चालत असल्यामुळे धुळ-माती हवेत उडून या परिसरात नेहमीच धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. या वातावरणातील धुळीचेकण हवेतून उरण, पनवेल व मुंबई परिसरात पसरल्यामुळे या विभागातील नागरीकांना दिर्घ काळ खोकला आणि श्वसनाचे आजार जडले आहेत.
या विरोधात उरण सामाजिक संस्थेतर्फे मंगळवारी (दि.05) सकाळी 10.30 वाजता पाडेघर येथे महामार्गावर खालील मागण्यासाठी निदर्शने आयोजित केली आहेत. यावेळी प्रामुख्याने पाडेघर-गव्हाण परिसर महामार्गावरील आणि इतर ठिकाणचीही धुळ-माती पूर्णपणे साफ करून घेणे, धुळ-माती पडणारा रस्ता नियमितपणे पाण्याने धुवून काढावा, गव्हाणफाटा परिसरातील क्रशर-दगडखाणीचि धुळ महामार्गावर पडू नये म्हणून त्या ठिकाणी पार्टिशन लावण्यात यावेत, अशा मागणी यावेळी करण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, पोलीस महासंचालक (वाहतूक विभाग) मुंबई, एनएचएआय यांना निवेदन दिले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न आणि प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन या निदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन उरण सामाजिक संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.







