| पनवेल | वार्ताहर |
खारघरमध्ये राहणाऱ्या एका पिता-पुत्राने फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस निरीक्षकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुकाराम मुळे व गौरव मुळे अशी या पिता-पुत्रांची नावे असून या दोघांनी अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले पोलीस निरीक्षक मुंबई पोलीस दलात गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत. 2016 मध्ये त्यांना नवीन घर विकत घ्यायचे होते. त्यावेळी तुकाराम मुळे आणि त्यांचा मुलगा गौरव मुळे हे दोघेही पनवेलच्या करंजाडे सेक्टर-6 भागात सनदीप कॉर्नर नावाने इमारतीचे बांधकाम करत असल्याची माहिती या पोलिस निरीक्षकला मिळाली होती. मुळे पिता-पुत्रांनी साडेबारा टक्के योजनेतील प्लॉटवर इमारतीचे बांधकाम करत असल्याचे सांगितले होते. सर्व परवानग्या घेण्यात आल्याचे तसेच दीड वर्षांमध्ये फ्लॅटचा ताबा देणार असल्याचे या निरीक्षकाला सांगितले होते. मुळे यांनी सनदीप कॉर्नर प्रोजेक्टसंदर्भात सिडकोकडून मिळालेल्या परवानग्या त्यांना दाखविल्या होत्या. त्यानंतर 23 लाख रुपयांमध्ये फ्लॅटच्या विक्रीचा व्यवहार ठरला. त्यानंतर पोलीस निरीक्षकाने तुकाराम मुळे यांना 1 लाख रुपयांची रक्कम देऊन 103 क्रमांकाच्या फ्लॅटचे बुकिंग केले. त्यानंतर या पोलीस निरीक्षकाने मुळे याने मुळे पिता-पुत्राला आणखी 8 लाख रुपये चेकद्वारे दिले. तसेच त्यांना फ्लॅटची त्यांच्या नावाने नोंदणी करून देण्यास सांगितले. मात्र मुळे पिता-पुत्रांनी वेगवेगळी कारणे सांगून नोंदणीस टाळाटाळ केली. त्यानंतर पोलीस निरीक्षकाने माहिती घेतली असता, हा फ्लॅट विकण्याचा अधिकार मुळे पिता-पुत्रांना नसतानाही त्यांनी फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे लक्षात आले.