। नवी दिल्ली। वृत्तसंस्था ।
भारताच्या अंध क्रिकेट संघाला प्रगतिपथावर आरूढ होण्यासाठी बीसीसीआयच्या मदतीची, मान्यतेची गरज आहे, असे मत या संघाचे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद इब्राहिम यांनी व्यक्त केले आहे.
मोहम्मद इब्राहिम पुढे सांगतात की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून तेथील अंध क्रिकेट संघाला साह्य करण्यात येते. त्यांना करारबद्ध करण्यात येते. अंध क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देण्यात येते. तसेच पाकिस्तानचा अंध संघ संपूर्ण वर्षभर क्रिकेट खेळत असतो. आमच्यासाठी मात्र नागेश करंडकाच्या रूपात एकमात्र स्थानिक स्पर्धा आयोजित केली जाते.
बीसीसीआयकडून मुख्य पुरुष व महिला संघांतील खेळाडूंना करारबद्ध करण्यात येते. त्यांच्यासाठी श्रेणी तयार करण्यात येते. श्रेणीनुसार खेळाडूंना मानधन देण्यात येते. बीसीसीआयने अंध क्रिकेटपटूंसाठीही याची सुरुवात करायला हवी. त्यानंतर अंध क्रिकेटपटूंचा संघ पुढे चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकतो, असा विश्वास मोहम्मद इब्राहिम यांनी व्यक्त केला.
सध्या अंध क्रिकेटपटूंसाठी सुगीचे दिवस आले आहेत, अशी भावना भारतीय अंध क्रिकेट संघटनेचे सरचिटणीस शैलेंद्र यादव यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, अंध संघाचे माजी कर्णधार शेखर नाईक यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजय रेड्डी यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्र तसेच विविध राज्य सरकारकडून अंध क्रिकेटपटूंना आर्थिक मदत करण्यात येत आहे. हरियाना, केरळ व ओडिशा सरकारकडून नोकर्या देण्यात आल्या आहेत. सरकारकडून आणखी काही खेळाडूंना नोकर्या मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतामध्ये अद्याप बीसीसीआयकडून अंध क्रिकेट संघाला मान्यता देण्यात आलेली नाही; पण ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड व झिम्बाब्वे या देशांमधील राष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून अंध क्रिकेट संघटनेला मान्यता देण्यात आली आहे. आगामी काळात बीसीसीआयकडून अंध क्रिकेट संघटनेला मान्यता देण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको.







