| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीमार्फत वेलवली ते उसर अशी सेलची (कार्गो) वाहतूक करण्यात येणार आहे. त्यामुळे वेलवली ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि. 6 ते 9 मार्च या कालावधीकरिता सकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा ते अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावेफाटा-चौलनाका-नागाव-सहाण बायपासमार्गे बेलकडे फाटा ते अलिबागमार्गे तसेच अलिबाग ते रोहा बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग-बेलकडे फाटा-सहाण बायपास मार्गे नागाव-चौलनाका-वावेफाटामार्गे रोहा अशा पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.
भारत सरकारच्या गेल कंपनीला सेलची (कार्गो) वाहतूक करण्याचे काम फॅबटॅक वर्कस् ॲण्ड कनस्ट्रक्शन या कंपनीला मिळालेले आहे. कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या उत्पादनाची वाहतूक मे. प्रिझम लॉजेस्टीक प्रा.लि. या कंपनीकडून करण्यात येणार आहे. वाहतूक करण्यात येणाऱ्या सेलची रूंदी 9.80 मिटर व उंची 10.30 मिटर व लांबी 27.15 मिटर आहे. या सेलची वाहतुक ही 6 मार्च 2024 व 9 मार्च 2024 रोजी सकाळी 4 ते 8 वाजेपर्यतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या सेलची रूंदी व उंची जास्त असल्याकारणाने वाहतुकीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा रुट सहें रिपोर्ट, एमएसइबी तसेच आरटीओ यांच्याकडून योग्य तो उपाययोजना करण्यात येणार असल्याबाबतचे पत्र फॅबटॅक वर्कस् ॲण्ड कन्स्ट्रक्शन या कंपनीने प्राप्त केले आहे. ही वाहतूक करतेवेळी वाहतूक कोंडी निर्माण होणार असल्याने वाहन चालक व नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.