| रोहा | प्रतिनिधी |
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान (दि.1) जानेवारी ते (दि.15) फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात रोहा तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात कोकण एज्युकेशन सोसायटीचे मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
या अभियानात 107 वर्षात प्रदार्पण करणाऱ्या मेहेंदळे हायस्कूलने शासनाने ठेवलेल्या 30 निकषापैकी सर्वच निकषे पूर्ण केली. या शाळेची भव्य इमारत, हिरवीगार पारसबाग, परिसर व वर्ग स्वच्छता, थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय, डिजिटल वर्ग खोल्या, क्रीडा खेळांची प्रशस्त मैदाने, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्काऊट गाईड, आरएसपी इत्यादी बाबींचे परीक्षकांनी कौतुक केले. त्याचबरोबर विविध विषयांच्या स्पर्धा, शैक्षणिक सहल,स्वच्छता व अंधश्रद्धा विषयक शिबिरे आणि प्रभातफेऱ्या,विज्ञान प्रदर्शने, विज्ञान गणित दिन, शिष्यवृत्ती परीक्षा अशाप्रकारच्या राबविण्यात आलेल्या अनेक नाविन्यपूर्वक उपक्रमांची तपासणी केली. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी साकारलेल्या सुबक रांगोळ्या, वर्गसजावट या गोष्टी खास आकर्षित ठरल्या. या अभियानामध्ये सहभागी झालेले शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीमुळेच कोएसो मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभागी होऊन यश प्राप्त केल्यामुळे रोहा तालुका गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे, मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन संदीप गांगल, प्राचार्य रमेश मोसे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्त कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे पालकवर्ग आणि इतर ठिकाणांहून कौतुक करण्यात येत आहे.






