तहसीलदारांकडून माती माफियांवर दंडात्मक कारवाईचे अश्वासन
| पाली | वार्ताहर |
ज्येष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी माती माफियांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण सुरु केले होते. पाली तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर तीन दिवसांअखेर रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी आपले उपोषण तुर्तास स्थगित केले.
सुधागड तालुक्यात गेली अनेक महिन्यांपासून महागाव, जांभूळपाडा हरणेरी, उद्धर, खुरावले, सिद्धेश्वर, ढोकशेत या भागात अवैध रीत्या अनधिकृत माती व दगडाचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे.काही जुजबी रॉयल्टी भरुन हजारो ब्रास माती उत्खनन करून लाखोंचा महसूल बुडविण्यात आला आहे. ही बाब सुधागड प्रेस क्लबच्या पत्रकारांनी संबंधित महसूल अधिकारी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांच्या निदर्शनास आणून देऊन फेर पंचनामे करण्याची मागणी केली मात्र या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली.
पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्थंभ असून या स्तंभाचा अवमान करण्यात आला. शासनाच्या तिजोरीत भर पडावी या हेतूने प्रशासनाचे अनधिकृत उत्खननाकडे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. अखेर याविरोधात पत्रकारांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागले.
ज्येष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ यांच्या तीन दिवसांच्या आमरण उपोषानंतर प्रशासनाने माती उत्खनन झालेल्या ठिकाणचे फेर पंचनामे करून अतिरिक्त उत्खनन झाले असल्यास नियमोचित दंडात्मक कारवाईचे पत्र उपोषणकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांना देऊन उपोषण तुर्तास स्थगित केले.मात्र 15 दिवसांत पत्राद्वारे दिलेले आश्वासन प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले नाही तर पुन्हा याविरोधात उपोषणास बसणार असल्याचे रवींद्रनाथ ओव्हाळ म्हणाले.