। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरणात मात्र 49 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरणात अद्याप पुढील 137 दिवस पुरेल एवढा जलसाठा धरणात आहे. नवी मुंबईकरांना मात्र 10 ऑगस्टपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येईल एवढा पाणीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे. तरीदेखील नवी मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण 24 सप्टेंबर 2023 रोजी 100 टक्के भरले व धरणातून 19.087 क्युबिक मीटर पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. महापालिकेच्या लोकसंख्येच्या मानाने धरणातून अधिक पाणी उपसा केला जात आहे.
महापालिकेने अर्थसंकल्पातही भिरा कुंडलिका प्रकल्पातील तसेच नवीन पाणीस्राोत निर्माण करण्याकडेही नियोजन केले आहे. तसेच पालिका सिडकोकडून 10 एमएलडी पाण्याची देवाणघेवाण करण्याच्या तयारीत आहे. महापालिकेला एमआयडीसीकडून मिळणार हक्काचे 80 एमएलडी पाणी मिळत नसून आजघडीला ते फक्त 70 एमएलडीपर्यंत मिळत असल्याने पालिकेच्या हक्काचे जवळजवळ 10 एमएलडी अतिरिक्त पाणी शिंदे मिळवून देतील अशी आशा आहे. महापालिकेने पाणी वितरण व्यवस्थेबाबत व मोरबेतील पाणी उपशाबाबत दिवसाला धरणातून 450 दशलक्ष लिटर पाणी उपसा एवढेच पाणी घेतले जाण्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.