कार्यकर्ते, मतदारांनी फिरवली पाठ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पनवेलमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना वाढता पाठिंबा बघता पनवलचे भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पराभवाची भीती वाटू लागली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीने थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. आज खारघर येथे पार पडलेल्या सभेत मोदींचा विशेष करिश्मा दिसून आला नाही.
सभेला मतदारांसह कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने सुमारे पाच हजाराहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. 2014 साली मोदींची लाट होती असे बोलले जात होते. मात्र, देशासाठी ठोस काही करत नसल्याचे मतदारांच्या लक्षात आल्याने ती लाट आता 2024 पर्यंत ओसरली आहे. मोदी जरी स्टार प्रचारक असले, तरी त्यांच्या सभेत आज रिकाम्या खुर्च्या दिसल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मोदींनी ज्या उमेदवारांचा प्रचार केला त्यांना पराभवाची चव चाखायला लागल्याचे विरोधक सातत्याने बोलूनदाखवतात.
पंतप्रधानांच्या सभेत गर्दी जमविण्यासाठी भाजप सरकारकडून महिलांना आणण्यात आले होते. सायंकाळी चारच्या कार्यक्रमासाठी दुपारी दोन वाजल्यापासून महिला तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भाजप सरकारकडून मोठा गाजावाजा करून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते; परंतु नियोजन नसल्याने महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रखरखत्या उन्हात जवळपास एक किलोमीटरची पायपीट करून सभा मंडपात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना आपल्यासोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या मंडपात नेण्यापासून पोलिसांनी मनाई केल्याने कार्यकर्ते त्रासल्याचे पाहायला मिळाले. तर काळी टोपी अथवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आलेल्या कार्यकर्त्यांना देखील मंडपात प्रवेश करण्यापासून रोखले जात असल्याने पंतप्रधान मोदींना काळ्या रंगाची इतकी भीती का? असा सवाल सभेला उपस्थित नागरिक विचारत होते. यावेळी काळे कपडे परिधान करून आलेल्या काही कार्यकर्त्यांना सभा मंडपात जाण्यापासून रोखण्यात आल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले. तसेच सुरवातीच्या काळात खिशात चावी अथवा इतर धातूच्या वस्तू असलेल्या कार्यकर्त्यांनाही रोखण्यात आले होते. यामुळे उडालेल्या गोधळानंतर चावी असलेल्या कार्यकर्त्यांना सभास्थळी सोडण्यात आले. सभेला येणार्या नागरिकांची वाहने उभी करण्यासाठी सभेच्या स्थळापासून काही किलोमीटर अंतरावर वाहनतळ बनवण्यात आले होते. तसेच त्या मार्गावरील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम?
महाराष्ट्रात एकाच टप्यात निवडणूक होणार असल्याने महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीला शेजारील गुजरात राज्यातील 50 पोलीस तैनात करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पंतप्रधान मोदी यांना विश्वास नसल्याने या सभेला गुजरात पोलीस तैनात केल्याची चर्चा परिसरात सुरु होती. त्यामुळे गुजराती पोलीस हा देखील चर्चेचा विषय झाला होता.