अंगणवाडी सेविकांचे पथनाट्याचे सादरीकरण
| तळा | वार्ताहर |
तळा तहसील कार्यालय तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या स्वीप पथकांतर्गत बुधवार, दि. 10 मार्च रोजी तळा बाजारपेठेतील बळीचा नाका ते बस स्टॅन्डदरम्यान तळा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची रॅली काढण्यात आली.
यावेळी तहसीलदार स्वाती पाटील, कृषी अधिकारी आनंद कांबळे, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या दिपाली शेळके, अंगणवाडी सेविका, मदतनीस, तहसीलचे कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. स्वीप पथकाच्या नूडल ऑफिसर दिपाली हरिश्चंद्र शेळके एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तळा यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांमार्फत तळा बाजारपेठ परिसरात मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांना अधिक महत्त्व आहे हे अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना समजावून सांगितले. तसेच मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी नैतिकदृष्ट्या त्यांना प्रवृत्त केले. या पथनाट्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. त्यात मिता कांबळेकर, सरिता चांडीवकर, करिना मोरे, ऋतुजा हाटकर, मयुरी शिगवण, जान्हवी भिंगारे, आनिता जाधव, प्रगती पावशे, ऋतीना धायरेकर, अजगरी चिपळूणकर, वनिता मांडवकर, नचिता सुर्वे, अनिता पतारी, स्वाती गायकवाड, मानसी पोळेकर, प्रगती रिसबुड, गीतांजली धाडवे, कोमल वाढवळ, मैथिली शिर्के यांनी उत्कृष्ट अशी भूमिका पार पाडली.
या मतदान जनजागृतीसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजाराम थोरात, प्रा. डी.टी. आंबेगावे आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार स्वाती पाटील यांनी मतदारबंधू-भगिनींना मतदान जनजागृतीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. स्वीप पथकास प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.