| रायगड | वार्ताहर |
राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशातच हवामान विभागाने येत्या 48 तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची देखील शक्यता आहे, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आले आहे.
या ठिकाणी पावसाची शक्यता बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा , चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली याठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह पश्चिम विदर्भात पुन्हा शुक्रवारी वादळी पाऊस झाला. त्यामुळे पिके जमीनदोस्त झाली असून त्यांचे नुकसान वाढले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अंभई येथे वादळी पाऊस, तर रहिमाबाद परिसरात शुक्रवारी पुन्हा गारपीट झाली. टाकळी अंबड (घेवरी) येथे दुपारी शेतात काम करीत असताना वीज पडून सुधाकर धोंडिराम पाचे (वय 60) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.